कोरोनाने वाट लावली, किराणा आणि औषधासाठी मंगळसूत्र टाकले गहाण
कोरोना धोका वाढ असताना आता आर्थिक चटके बसू लागले आहेत. कोरोनामुळे आता नवीन संटकाची चाहूल लागली आहे.
बीड : कोरोना धोका वाढ असताना आता आर्थिक चटके बसू लागले आहेत. कोरोनामुळे आता नवीन संटकाची चाहूल लागली आहे. ही चाहूल एका संघर्षाची. संघर्ष जगण्याचा आणि जगवण्याचा. हातावर पोट असलेल्या मजुरांवर लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढवले आहे. किराणा आणि औषधासाठी मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ एका कुटुंबावर आली आहे.
संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. सर्व व्यवहार बंद आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणली तरी आर्थिक प्रश्न कायम आहे. अनेकांवर आर्थिक संकट कोसळत आहे. जगण्यासाठी आता संघर्ष करण्याची वेळ आली आहे. किराणा आणि औषधासाठी सीताबाई यांनी काळजावर दगड ठेवून आपले मंगळसूत्र गहाण टाकले आहे. आर्थिक संकटाचा सामना कसा करायचा, हातावर पोट असणाऱ्यांसमोर प्रश्न किती गंभीर झालाय, हे यावरुन स्पष्ट होत आहे.
बीडमधल्या सीताबाई टाक यांच्यासमोरही दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे. धुणी-भांडी करून घर चालवणाऱ्या सीताबाईंनी अन्नधान्य आणि औषधांसाठी स्वत:चं मंगळसूत्र गहाण ठेवलंय. कोरोनानं अत्यंत वाईट दिवस आणल्याची प्रतिक्रिया त्या देतात. कोरोनाशी दोन हात करताना आर्थिक संकटाचा मुकाबला कसा करायचा असा प्रश्न सीताबाईंसारख्या हजारो कुटुंबासमोर आहे.